तुटीचा घोषणाबाज अर्थसंकल्प; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची घणाघाती टीका

मुंबई : सरकारने सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा राज्याला अधोगतीला नेणारा असून तुटीचा घोषणाबाज अर्थसंकल्प असल्याची टीका करत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज, शुक्रवारी (5 जुलै) सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरून सरकारवर निशाणा साधला. अंबादास दानवे म्हणाले, राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, तूट आणि तरतूद यात कोणतेही मेळ दिसून येत नसून अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस दिसत आहे. सरकारने जनतेला केवळ गाजर दाखवले आहे. राज्यावर 7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असताना 27 फेब्रुवारी रोजी सरकारने 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद अंतरिम अर्थसंकल्पात केली होती, तर यंदा 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद केलेला अर्थसंकल्प सादर केला.
राज्याचा विकास दर 7.6 टक्के, कृषी क्षेत्राचा 1.9 टक्के आणि उद्योग क्षेत्राचा 7.6 टक्के विकास दर असणार आहे. महसूल तूट 20 हजार 50 कोटी रूपये आहे. राज कोषिय तूट ही १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये इतकी आहे. एवढी तूट असताना सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांचा मेळ नसल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी संत तुकाराम यांचा अभंग सादर करत सरकारला टोला लगावला.
अंबादास दानवे म्हणाले की, हे सरकार अल्पकालीन असल्याने त्यांनी अर्थसंकल्पातून घोषणांच्या थापा मारल्या आहेत. सरकारने अनेक घोषणा केल्या आणि जाहीरात फलक लावत उपमुख्यमंत्र्यांनी उदोउदो केला. प्रत्यक्षात माता, भगिनी, युवक यांना योजना आणून सरकारने फेक अर्थसंकल्प सादर केला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सरकारने लाडली बहीण योजनेची कॉपी केली. मात्र या योजनेनंतर त्या मुख्यमंत्री यांना घरी बसावे लागले. आर्थिक कुवत नसल्यामुळे उज्वला गॅस योजनेप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बंद होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मेट्रोच्या कामात मोठा भ्रष्टाचार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील मेट्रोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सीताबर्डी येथे मेट्रो स्टेशनचे काम नीट केले नव्हते, तरीही पुन्हा त्याच कंपनीला काम का दिले? असा प्रश्न उपस्थित करत नागपूरच्या मेट्रो प्रकल्पावरून कॅगने सादर केलेल्या अहवालाचा दाखला देत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. जयंत पाटील म्हणाले, सरकारमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. एखादा प्रकल्प किंवा टेंडर असे मॅनेज केले जाते की ऑडिटमध्ये काहीही समोर येत नाही. नागपुरात मोठ्या प्रमाणावर मेट्रोची उभारणी होत आहे. सीताबार्डी मेट्रो स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही नव्याने याच कंपनीला कोट्यावधी रुपयांचा आगाऊ रोख रक्कम देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.





