उस्मानाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांची नावे लिहिलेली आहेत, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्व देऊन राष्ट्रवादी सोबत राहतील आणि त्यांचा पराभव करतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सभा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे संपन्न झाली. त्या सभेला पाटील पिता-पुत्र गैरहजर होते. या सभेला खासदार अमोल कोल्हे, अमोल मेटकरी, आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, 15 वर्षे तुम्ही मंत्रीमंडळात होता, आता पवार साहेब अडचणीत आहेत आणि थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंद-फितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झाले आहे. म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
फंद-फितुरी करून महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे फितुरांच्या नादाला लागू नका. सूर्याजी पिसाळ कोण आहे हे महाराष्ट्राला कळू द्या आणि त्यापैकी एकही निवडून येणार नाही, असे पाटील म्हणाले. आपल्या राष्ट्रवादीकडे नगाला नग असे उमेदवार आणि नेतृत्व आहे. कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आपल्याकडे आहे.
निष्ठा आणि विचाराला आयुष्यात काही महत्व असते. कोणाला पक्ष सोडायचा असेल तर तो मतलबाने सोडत आहे. ज्यांना भवितव्य अंधारात दिसत आहे, ते एका निवडणुकीत घाईला आले असून पक्ष सोडत आहेत, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.