बॉलिवूडचा जगभरात डंका! दीपिका पादुकोण बनली फिफा ट्राॅफीचं अनावरण करणारी पहिली अभिनेत्री

कतार, दोहा – फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या वादादरम्यान तिने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हजेरी लावली होती. आणि तिच्या हस्ते ट्राॅफीचं अनावरण झाल्यानंतर आता तिच्यावर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर अनेकांनी ही बाब भारतासाठी अभिमानाची असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावेळी देखील दीपिका तिच्या ड्रेसकोडमुळे ट्रोल झाली आहे. फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. ड्रेस, त्यावर चॉकलेटी रंगांचं जॅकेट आणि काळ्या रंगाचे बूट असा दीपिकाचा लूक होता. दीपिका फिफा विश्वचषकाचा एक भाग असल्याने प्रचंड आनंदी आहे. व्हायरल फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. जगभरात पहिल्यांदाच एका अभिनेत्रीला ट्राॅफीचं अनावरण करण्याचा मान मिळाल्याने दीपिकाचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
View this post on Instagram
दरम्यान, दीपिकाच्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला जात आहे. भगवा रंगाचे कपडे परिधान करून अश्लील हावभाव केल्यामुळे काही हिंदूत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पठाण चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

