मराठीचे वाभाडे काढणाऱ्या ‘त्या’ कवितेवर शिक्षणमंत्र्यांनी दिले अजब स्पष्टीकरण; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे वाचक वर्गानेही त्या कवितेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर स्पष्टीकरण देताना शिक्षणमंत्र्यांनी अजब वक्तव्य केले आहे. ‘वन्समोअरला पर्यायी शब्द नाही आहे. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द येऊ शकतो’, असं अजब स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
नेमके काय म्हणाले दीपक केसरकर?
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘वन्समोअरला पर्यायी शब्द नाही. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून येऊ शकतो. त्यामुळे त्याचा फार मोठा बाऊ करण्याची गरज नाही. काही शब्द रुढ झाले आहेत. आपण टेबलला टेबलच म्हणतो,कपबशीला कपबशीच बोलतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचे धोरण मीच आणलं त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव असणार. 18 वर्ष मराठी भाषेचं धोरण आलं नव्हतं, तेव्हा कोणाला त्याचा कळवळा आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे.
‘या’ कवितेवरून झाला वाद
‘जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !





