Deepak Chahar Wickets : मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या गोलंदाजाचा वानखेडेवर कहर! अवघ्या १३ धावांत ३ विकेट् घेत रचला मोठा पराक्रम
Deepak Chahar Wickets SMAT : आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी, दीपक चहरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालविरुद्ध १३ धावांत ३ विकेट्स घेत २०० टी-२० विकेट्स पूर्ण केले.

Deepak Chahar takes 3/13 for against Bengal to complete 200 T20 wickets : आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावापूर्वी वेगवान गोलंदाज दीपक चहरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपली दावेदारी भक्कम केली आहे. १६ डिसेंबरला गोव्यात होणाऱ्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने मुक्त केलेल्या चहरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ मध्ये राजस्थानकडून खेळताना बंगालविरुद्ध भेदक मारा केला. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवरील अंतिम साखळी सामन्यात त्याने टी-२० कारकिर्दीतील २०० विकेट्स पूर्ण करत लिलावात कोट्यवधींची बोली लागण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अवघ्या १३ धावांत तीन विकेट्स घेत बंगालला रोखले –
३४ वर्षीय दीपक चहरने चार षटकांत अवघ्या १३ धावांत तीन विकेट्स टिपल्याने बंगालला २० षटकांत ९ बाद १५७ धावाच करता आल्या. अभिषेक बॅनर्जीला कुणाल सिंग राठोडकरवी, तर आदित्य पुरोहितला रोहन राजभरकरवी झेलबाद करून त्याने तिसऱ्या षटकात बंगालची अवस्था २ बाद ९ केली. प्रदीप्त प्रामाणिकला बाद करत त्याने २०० विकेट्स पूर्ण केले. बंगालसाठी शाकीर गांधीने ४३ चेंडूंत सर्वाधिक ६९ धावा केल्या.
दोन कोटी मूळ किमतीसह लिलावाच्या रिंगणात –
An excellent spell to complete 2️⃣0️⃣0️⃣ career wickets in T20 cricket 👏
🎥 Deepak Chahar’s 3/13 in 4 overs boosts Rajasthan in a crucial contest 🔥
Updates ▶️ https://t.co/v8PfKFWtAu
#SMAT | @mflone_ | @deepak_chahar9 | @CricketRaj https://t.co/jkFEfJDtLR
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 26, 2026
आगामी लिलावात दीपक चहर दोन कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह उतरणार असतानाच ही चमकदार कामगिरी समोर आली आहे. आयपीएल २०२६ पर्यंत त्याचे मानधन ९.२५ कोटी रुपये होते. मुंबई इंडियन्सने मुक्त केलेल्या १३ खेळाडूंत समावेश झाल्यानंतर आता सर्व दहा फ्रँचायझींची नजर त्याच्या अनुभवावर आणि नव्या चेंडूने विकेट्स घेण्याच्या क्षमतेवर आहे. दोन कोटींच्या गटात चहरसह आवेश खान हा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे.
१८१ सामन्यांत २०० विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण –
दीपक चहरने टी-२० क्रिकेटमधील १८१ सामन्यांत आता २०० विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये २०१९ मध्ये भारताकडून बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिकसह सात धावांत घेतलेल्या सहा विकेट्सचा सर्वोत्तम कामगिरीत समावेश आहे. आयपीएल संघांना नेहमीच अनुभवी आणि विकेट मिळवून देणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांची गरज असते. अशा स्थितीत सातत्यपूर्ण फॉर्म आणि तंदुरुस्ती सिद्ध करणारा चहरचा हा स्पेल लिलावात मोठा डाव लावण्यासाठी निर्णायक ठरू शकतो.





