Sanjay Singh : पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा; आपचे खासदार संजय सिंह यांची मागणी

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. आता भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी केंद्र सरकारकडे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.
आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावा आणि आम्ही पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करू. ते दहशतवाद्यांना आश्रय देतात आणि त्यांचे तळ तिथे वाढतात. संपूर्ण देशाने पाहिले आहे की त्यांचे लष्करी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहतात. अशा देशावर आपण कसा विश्वास ठेवू शकतो? केंद्रातील भाजप सरकारने लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवल्याबद्दल सिंह यांनी टीका केली.
आपले सैन्य योग्य उत्तर देत होते, परंतु नंतर आम्ही युद्धबंदीची घोषणा केली. आपण हे कसे स्वीकारू शकतो? २२ एप्रिल रोजी आपल्या लोकांना मारणारे दहशतवादी कुठे आहेत?अशी विचारणा त्यांनी केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही चिंता व्यक्त केली आणि न्याय मिळाला आहे का असा प्रश्न केला.
देशाला जाणून घ्यायचे आहे की – पहलगाम हल्ल्यातील दोषी दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का? सिंदूरचा बदला घेण्यात आला आहे का? आपचे दिल्ली युनिट प्रमुख सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर त्यांच्या निवडणूक आश्वासनांपासून मागे हटल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की २०२४ च्या निवडणुकीदरम्यान भाजप नेतृत्वाने आश्वासन दिले होते की जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेतला जाईल. सहा महिने उलटले आहेत आणि पीओके परत घेण्याऐवजी आपले सैन्य मागे घेण्यात आले आहे.





