दौंडच्या जिरायती भागात दुष्काळ जाहीर करा

file pic

जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची मागणी

वासुंदे – दौंड-बारामती तालुक्‍यांतील जिरायती भागात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. या भागात काही ठिकाणी अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले, त्या भागात पूरग्रस्तांचे पंचनामे सरकारतर्फे झाले असले तरी अजून जिथे पावसाअभावी पेरणीही झाली नाही, अशा ठिकाणांबाबत सरकारचे काय धोरण आहे, हे निश्‍चित झालेले नाही.

दौंड-बारामती तालुक्‍यांतील जिरायती भागात वरदान म्हणून लाभलेल्या जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून तलावात पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ही मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. या दोन तालुक्‍यांतील दुष्काळी स्थिती पाहता फक्‍त जनावरांना व माणसांना पिण्यासाठीच शिरसाई योजनेसाठी अत्यल्प एमसेफटी व जानाई योजनेसाठी काही एमसेफटी एवढेच पाणी मिळावे, अशी अपेक्षा पशुधारक व ग्रामस्थ करत आहेत. मात्र, जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे जिकरीचे बनले आहे.

राजकीय मंडळीकडून मतदार संघात कसं पाणी पोहोचवता येईल, याबाबत स्थानिकांनाबरोबर बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. मात्र, अधिकारी उत्साही नसल्यामुळे शेतकरीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभा निवडणूक जवळ असल्याने राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या मागणीचा रास्त मागणीवर विचार करत आहेत; पण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे त्यांना कित्येक वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून देखील याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांवर नाराज आहेत.

ऐन पावसाळ्यात दौंड तालुक्‍यातील जिरायती भाग दुष्काळात आहे. सरकारने जिरायती भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून सर्व तलावात पाणी सोडावे, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्‍त केले जात आहे.

चारा छावण्या नावालाच!
शासनाने शेतकऱ्यांना ज्या भागात पुराचा अतिवृष्टीचा फटका बसला त्यातील पंचनामे केले. तिथे शासकीय मदत जाहीर केली कर्ज माफ केली. मात्र, सलग चार वर्षे दुष्काळ जिथे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. येथील शेतकऱ्यांना खरी मदत करणे गरजेचे आहे. या भागात चारा छावणी नावालाच उभारल्या होत्या, त्यामधून शेतकऱ्यांना फायदा झालेला दिसत नाही, आता तरी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे, तसेच जनावरांसाठी चारा छावणी किवा चारा डेपो सुरू करण्याची गरजही असून येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची गरज आहे.

पाण्याची सर्रास चोरी
जानाई उपसा सिंचन योजनेतून वासुंदे (ता. दौंड) येथील चिंचेच्या तलावात मागील दहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अद्याप एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सिंचन योजनेच्या कॅनॉलवर ठिकठिकाणी विद्युत पंपाद्वारे, तर काही ठिकाणी कॅनॉल फोडून पाणी चोरी होत आहे. मात्र यावर कोणत्याही अधिकाऱ्याची तत्परता दिसून येत नाही.

सरकारी अधिकारी “नॉट-रिचेबल’
यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्यांना कॉल केला असता- आम्हाला एवढेच काम आहे का, सॉरी… अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. समोरच्या व्यक्‍तीचे म्हणणे ऐकून न घेताच कॉल रिजेक्‍ट केला जातो, त्यामुळे अधिकाऱ्यांचे “टेल टू हेड’चे नियोजन काय आहे, ते दिसून येत आहे. अशा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायद्यानुसार किंवा अन्य मार्गाने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर वरिष्ठ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात यावी, असे येथील स्थानिक शेतकऱ्यांचे मत आहे

दौंड तालुक्‍यातील दक्षिण पट्टयातील जिराईत भागात येणाऱ्या गावांत सध्या नऊ शासकीय टॅंकरच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात या भागात पाऊस झाला नाही, तर शासकीय टॅंकरची संख्या आणखी वाढू शकते.
– गणेश मोरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती दौंड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)