Baramati : बारामतीत कोरडा दुष्काळ जाहीर करा
Baramati : शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी.

माळेगाव : पावसाच्या खंडामुळे बारामतीसह राज्यभरात ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा पश्चिम विभाग (बारामती) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने ऊस आणि खरीप पिके पूर्णपणे संकटात सापडली असून, यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्यावी. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे, पिण्याच्या पाण्याची सोय आणि जनावरांच्या चाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक शुल्कासह स्पर्धा परीक्षांचे शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली. “शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेतकऱ्यांची मुले शिकली तरच भविष्य घडेल,” असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या निवेदनावेळी संभाजी ब्रिगेड पुणे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री विनोद जगताप, बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, संघटक सागर गाडे, आप्पासाहेब लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





