Marathwada : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
Marathwada : शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत द्या

पिंपरी : मराठवाड्यात यंदा जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, पेरणीनंतर जवळपास तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांतील पिके सुकून चालली असून, शासनाने तातडीने मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अल्प पावसाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. त्यासाठी बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या परिस्थितीची राज्य व केंद्र शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. मराठवाड्यातील सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलासा म्हणून प्रति एकर एक लाख रुपये आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळी सवलती तसेच शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ त्वरित मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. संकटाच्या काळात केवळ घोषणा न करता शासनाने प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली. या निवेदनावर शहराध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष विशाल मिठे आणि उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Pune District : श्रीक्षेत्र ओझर येथे पहिल्याच दिवशी दोन द्वार यात्रा उत्साहात





