नक्षलवादी कमांडर संजय रावच्या डीएनए चाचणी अर्जावर गुरूवारी निर्णय

पुणे : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षासाठी वेगवेगळ्या नावांनी भूमिगत राहून काम करणारा केंद्रीय समितीचा सदस्य संजय दीपक राव ऊर्फ विजय याच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणी करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या अर्जावर गुरूवारी (दि. 18) निर्णय होणार आहे.
पुण्यातील विशेष न्यायालयात करण्यात आलेल्या अर्जावर सोमवारी (दि. 15) निर्णय होणार होता. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यासाठी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी पुढील तारीख दिल्याने ती आत्ता गुरूवारी होणार असल्याची माहिती राव याचे वकील रोहन नहार यांनी दिली.
राव याचा फोटो आणि वेगवेगळे नाव असलेली आधार कार्ड तपास यंत्रणेने हैदराबाद येथून जप्त केली आहेत. त्याने संघटनेच्या कामासाठी वेगवेगळ्या कालावधीत विविध ठिकाणी अनेक नावे धारण करून भूमिगत काम केले आहे.
स्वतःची ओळख लपविली असल्याने त्याची डीएनए चाचणी करणे आवश्यक असल्याकारणाने दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, राव याची यापुर्वीच आरोपीच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.





