Kolhapur Local Government Election : सर्वच राजकीय पक्षाला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर राज्यात निवडणुकीचे बिगूल वाजणार असल्याची शक्यता आहे. अशातच आतापासून राजकीय रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी आगामी स्थानिक निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रिपणे लढविण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर महायुतीच्या नेत्यांची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीत आमदरांना ७० टक्के आणि पालकमंत्र्यांना ३० निधीचे वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच राज्यात काहीही असो कोल्हापूर जिल्ह्यात मात्र महायुती म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीची बैठक कधी घ्यायची आणि निधी वाटप कसे करायचे यावर देखील चर्चा झाली. त्यानुसार 23 जूनला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांनी एकजूट दाखवत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू; RSS आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक