Nagar : ३१ डिसेंबरल साई समाधी मंदिर रात्रभर खुले

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर दि. ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.
श्री.कोळेकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्यरितीने व्हावे, या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दि.१ जानेवारी रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.तसेच नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे २५ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी असे ७ दिवस वाहन पूजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीचे कालावधीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु राहील. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही कोळेकर यांनी केले.





