BCCI & Team India T20 Captain : टी-20 विश्वचषक 2024 नंतर, रोहित शर्माने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या शोधात असून आतापर्यंत हार्दिक पांड्याचे नाव कर्णधारपदासाठी जवळपास निश्चित दिसत होते. पण परिस्थिती वाटते तितकी सोपी नाही कारण अचानक निर्णय घेणे बीसीसीआयसाठी खूप कठीण काम असल्याचे दिसते. आता प्रश्न असा पडतो की हार्दिक नाही तर कर्णधार कोणाला करायचं?
हार्दिकला का मिळणार नाही कर्णधारपद ?
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये उपस्थित असलेले सदस्य यांच्यात कोणाला कर्णधार बनवायचे यावर एकमत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे हार्दिक पांड्याचा फिटनेस.हार्दिक सध्या टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेत फलंदाजीत 144 धावा आणि गोलंदाजीत 11 विकेट्सही घेतल्या होत्या.
हार्दिकची तंदुरुस्ती ही इतकी गंभीर बाब आहे की, 2018 नंतर तो कसोटी क्रिकेटही खेळलेला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याच्या वर्कलोडवर बरेच लक्ष दिले गेले आहे. दुखापतीमुळे हार्दिक 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही खेळू शकला नव्हता. हार्दिकची फिटनेसची पातळी अशीच राहिल्यास त्याला कर्णधारपद मिळू शकत नाही, असे मानले जात आहे.
हार्दिक नाही तर कोण?
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत काहीही स्पष्ट नसल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नावाचीही चर्चा झाली आहे. असे सांगण्यात आले की, जेव्हा सूर्याने कर्णधार म्हणून काम केले तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी त्याच्या कामगिरीवर खूप प्रभावित झाले होते.
या अहवालात असेही समोर आले आहे की, नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मत कर्णधार निवडीत खूप महत्त्वाचे ठरू शकते. दरम्यान, लवकरच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या संघाला हिरवा सिग्नल दिला जाऊ शकतो.
हार्दिक आणि सूर्यकुमारचा कर्णधारपदाचा विक्रम…
हार्दिक पांड्याने 2022 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व केले. त्यानंतर, त्याने 16 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये 10 वेळा संघ विजयी झाला आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यापैकी त्याने 5 वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे.