महामार्गावर खंडाळ्यानजीक मृत्यूचा सापळा; 15 अपघात होऊनही प्रशासनाला येईना जाग

खंडाळा – पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव- खंडाळा व परिसराला नेहमीच अपघातांचे ग्रहण लागलेले दिसते. यामध्ये आणखी भर म्हणून महामार्ग प्रशासनाने रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली केसुर्डी पुलाच्या सुरुवातीला एका कंपनीसमोर उकरून ठेवलेल्या रस्त्यामुळे दररोज अपघात होत असून याकडे महामार्ग प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, पारगाव खंडाळा येथे महामार्गावरील केसुर्डी पूल परिसरात रस्त्याचे काम निघाल्याने संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर जेसीबीने ओरखडे मारण्यात आले आहेत. दरम्यान, या गोष्टीला जवळपास महिना होऊन गेला. सर्व ठिकाणी रस्ता भरून व्यवस्थित करण्यात आला. परंतु, केसुर्डी पुलाच्या सुरुवातीला असणाऱ्या एका कंपनीसमोरच जवळपास ५०- ६० मीटरचा रस्ता तसाच ठेवण्यात आला असून नेमक्या याच पट्ट्यामध्ये वारंवार अपघात होत आहेत.
समोरील बाजूस असणाऱ्या कंपनीच्या काही सुज्ञ कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणून दिली. परंतु, महामार्ग कर्मचारी याबाबत बिनधास्त असून याचा फटका दररोज होणाऱ्या अपघातांमधून दुचाकीस्वारांना सोसावा लागत आहे. या कालावधीमध्ये जवळपास 15 ते 20 दुचाकींचे अपघात झाले असून यामध्ये लोकांचे बळी गेल्यानंतरच महामार्ग प्रशासनाची झोप जाणार आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
महामार्गासोबतच या परिसरात असलेल्या एमआयडीसीमुळे दररोज हजारो लोक कामासाठी दुचाकीवरून याठिकाणी येत असतात. तरी देखील नेमक्या याच ठिकाणी रस्ता ओरखडून काम अर्धवट ठेवल्याने एकंदरीत सर्वसामान्यांचा जीव राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने सध्या वेशीवर टांगल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणखी किती लोकांचे जीव धोक्यात घालणार, अशा संतप्त सवालासह लवकरात लवकर या पट्ट्याचे काम पूर्ण करण्याची मागणी सध्या प्रवाशांमधून केली जात आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन ते तीन दिवसात दुरुस्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले.
“महामार्गावरील खंडाळा परिसरात एस कॉर्नर, खंबाटकी बोगदा, केसुर्डी पूल, खंबाटकी घाटातील तीव्र वळणावर असलेले खड्डे अशी अनेक धोकादायक ठिकाणे असून वारंवार होणाऱ्या अपघातातून राष्ट्रीय महामार्ग प्रशासन बोध का घेत नाही, अधिकाऱ्यांच्या डोळे झाकून सुरू असलेल्या कामाने लोकांच्या जीवाची प्रशासनाला काही पर्वा आहे का, लोकांच्या भावनांचा उद्रेक होण्याची वाट न पाहता तात्काळ संबंधित धोकादायक ठिकाणी काम पूर्ण करावे.”
– हिरालाल घाडगे (सरपंच, घाडगेवाडी)





