Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

धाराशिव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुमचा देखील संतोष देशमुख करू, अशी धमकी हल्लेखोरांनी एका पत्रातून दिली आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत अशी या पुतण्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे धनंजय सावंत यांच्या घरासमोर या पूर्वी देखील गोळीबाराची घटना घडली होती.
या प्रकारची धमकी मिळताच धनंजय सावंत आणि केशव सावंत यांनी ढोकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धनंजय सावंतांचा सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखाना आहे. केशव सावंत हे तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर अडवत अज्ञात दोघांनी चालकाला बंद पाकिट दिले. त्या बंद पाकिटात जीवे मारण्याचे धमकीचे पत्र होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाला होता. धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
या घटनेनंतर धनंजय सावंत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावरच पोलिस डिपार्टमेंट याचा शोध घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच धनंजय सावंत थेट राज्य गृहमंत्र्यांकडे या प्रकरणी तक्रार करणार असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेने धाराशिव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम शहर बंद ठेवण्याचा इशारा सावंत समर्थकांनी दिला आहे. या घटनेचा तपास लवकर व्हावा यासाठी धाराशिवमध्ये शिवसेनेकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.





