Pimpri : नेरेच्या सरपंचांना जीवे मारण्याची धमकी

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत ’तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो,’ अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 26) दुपारी नेरे गावात घडला. नेरे-दत्तवाडीचे सरपंच सचिन चिंतामण जाधव (वय 36) यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह राहुल सीताराम जाधव (वय 45) याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादातून हा प्रकार घडला आहे.
तक्रारदार व आरोपी हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. यापूर्वीही मासिक सभेत एकमेकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती. परंतु त्यावेळी हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचले नव्हते. गुरुवारी (दि. 26) नेरे गावात विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या सभेत अजेंड्यावरील विषय सुरू असताना गावात केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन वरून वाद सुरू झाला. त्यावेळी भूमीपूजनाचे फलक काढून टाक अन्यथा तुला तलवारीने तोडतो असा धमकीचा प्रकार घडला आहे.
नेरे गावच्या ग्रामसभेत झालेला हा प्रकार समजताच तत्काळ दोन्ही गटांना बोलावून घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून कायदेशीर समज व प्रतिबंधात्मक नोटीस बजाविण्यात आली आहे.
परंतु आशा प्रकरणांना वेळेत आवर न घातल्यास एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासन गांभीर्याने घेणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक कन्हेय्या थोरात यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.





