इटलीच्या समुद्र किनाऱ्यावर मृत्यूचे तांडव; बोट उलटून तब्बल ५९ जणांना जलसमाधी

रोम : इटलीच्या दक्षिण तटवर्ती भागात खवळलेल्या सागरात स्थलांतरितांची लाकडी बोट फुटल्याची दुर्घटना घडली आहे. या झालेल्या दुर्घटनेत तब्बल ५९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यात १२ लहान मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता इटलीच्या अंतर्गत मंत्री वॉन्डा फेरो यांनी वर्तवली आहे.
इटलीच्या सरकारी वृत्तवाहिनीने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याविषयी माहिती दिली आहे. सकाळपर्यंत ३३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तसेच आतापर्यंत ८१ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये काही महिन्यांच्या एका बाळाचा समावेश असल्याचे इटलीच्या एजीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या दुर्घटनेसंबंधी सरकारी रेडिओने वृत्त दिले आहे. कॅलाब्रिया प्रांतातील किनारपट्टीवरील क्रोटोन या शहरातील बंदर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, या नौकेत शंभरहून अधिक स्थलांतरित होते. आयोनियन समुद्रात भल्या पहाटे ही नौका फुटली. इटालीच्याच लॅप्रेसे या वृत्तसंस्थेने बचाव मोहिमेतील अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, या नौकेत सुमारे १८० लोक असावेत.
सरकारी दूरचित्रवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे की, दुर्घटनेनंतर २७ प्रवासी पोहून किनाऱ्यावर आले. ही दुर्घटना ज्या ठिकाणी झाली त्या नजीकच्या स्टेकॅटो डी कुट्रो या किनाऱ्यावर फुटलेल्या नौकेचे लाकडी अवशेष दिसून आले. तीन मृतदेह याच ठिकाणी वाहून आले होते.नौका कुठली? दुर्घटनाग्रस्त नौका कोणत्या ठिकाणाहून निघाली होती प्रारंभी स्पष्ट झाले नव्हते. पण, ही नौका तुर्कस्तानमधून निघाली होती आणि तीमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, सोमालियातील स्थलांतरित, निर्वासित होते, असे नंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.





