Bhor News : सुरक्षेतच्या कारणास्तव भोरमधील लाडक्या बहिणी घेणार पालकमंत्र्यांची भेट

भोर : मागील काही दिवसांपूर्वी भोर शहरातील श्रीपती नगर भागामध्ये चोरट्यांनी जवळपास 26 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरून धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन आज भोर पोलीस स्टेशनला श्रीपती नगर मधील महिलांनी दिले.
सध्या मांढरदेवीची यात्रा सुरू आहे. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या महिन्याभरामध्ये मांढरदेवीला अनेक भक्त, भाविक राज्यातून परराज्यातून मांढरदेवीला भोर मार्गे येत जातात. आणि याच यात्रा काळामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट देखील झालेला पाहायला मिळतोय. मागील काही वर्षांपासून यात्रेनिमित्त चोर देखील शहरात धुमाकूळ घालत आहेत. नुकताच भोरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 26 लाखांचा ऐवज हा लंपास केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात घर फोड्या केल्या आहेत. घरातील किमती वस्तू यांची देखील नासधूस केली आहे.
श्रीपती नगर परिसरात रात्री १२ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांचे गस्त पथक कार्यरत ठेवावे. अशी मागणी महिलांनी केली. महिलांनी भोर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार हवालदार वर्षा भोसले यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले.
मांढरदेवी यात्रा आणि चोरीच्या घटना
सध्या मांढरदेवीची यात्रा सुरू आहे. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या महिन्यात मांढरदेवीची यात्रा भरत असते. या मांढरदेवीच्या यात्रेला अनेक भक्त, भाविक राज्यातून परराज्यातून भोर मार्गे येत जात असतात. आणि याच यात्रा काळामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. मांढरदेवीची यात्रा आणि चोरी हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील खबरदारी म्हणून पोलिसांकडून कोणतीही यंत्रणा राबावली जात नाही. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आठवडे बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट
भोरच्या आठवडे बाजारात मागच्या काही महिन्यांपासून पाकीट मारणे, सोनसाखळी चोरणे, मोबाईल चोरणे, वृद्ध लोकांची गोड बोलून फसवणूक करणे अशा अनेक चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. मात्र पोलिसांकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. नागरिकांनी तक्रार केली तर पोलिसांकडून फक्त त्यांना आश्वासने दिली जात आहेत.यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. पोलिसांचा चोरट्यावर काहीच वचक राहिला नाही का? असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरातील सीसीटीव्ही निष्क्रिय
भोर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, मात्र हे सीसीटीव्ही कामच करत नाही आहेत.जवळजवळ सगळेच सीसीटीव्ही बंद आहेत. याबद्द्ल नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली.
आमदारांकडून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
या संदर्भात स्थानिक आमदारांशी किंवा नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून देखील लोकांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. जर लोकप्रतिनिधीच असे वागत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
६ वर्षांपासून नगरसेवक बेपत्ता
स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक असतात. मात्र श्रीपती नगर मधील नगरसेवक मागच्या ६ वर्षांपासून बेपत्ता आहेत. निवडणूका झाल्यानंतर या नेत्यांनी स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुका आल्या कि हे नेते आम्ही हे करू ते करू असे आश्वासन देतात मात्र एकदा निवडून आले कि ते आपल्या विभागाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी पोलिसांना निवेदन देताना धनश्री सोनवले, अनिता ताठे, ज्योती राजेशिर्के, आरती जगताप, आशा घोरपडे, शैलजा गायकवाड, रेखा किरवे, शैला बिराजदार सुषमा महांगरे, राणी घोलप, पूजा तिवारी, सना शेख, गौरी पवार, रूपा काटे, दिपाली पुणतांबेकर, नीलिमा मोरे, कुसुम भांडे, गौरी धोंडे, सुमिता जाधव, वृषाली पलंगे, संगीता आवारे, भारती मोरे रागिनी पलंगे आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.





