पाकिस्तानात मोहरमच्या मिरवणूकीत बॉम्बस्फोट

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मोहरमच्या मिरवणूकीदरम्यान झालेल्या एका शक्तीशाली बॉम्बस्फोटामध्ये किमान 2 जण ठार झाले आणि 25 जण जखमी झाले आहेत.
लाहोरपासून 260 किलोमटर अंतरावरील बहावलनगरमध्ये शिया समुदायाने मोहरम निमित्ताने काढलेल्या अशुरा मिरवणूकीदरम्यान हा बॉम्बस्फोट झाला. या मिरवणूकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरिही एका व्यक्तीने मिरवणूकीवर बॉम्ब फेकला असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांमध्ये 7 वर्षांची एक मुलगी आणि 20 वर्षांचा युवक आहे. अन्य 25 जण या स्फोटात जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी 10 वाजता ही मिरवणूक जामिया मस्जित मोहाजिर कॉलनी परिसरातून जात असताना हा स्फोट झाला.
पोलिसांनी या बॉम्बस्फोटामागील संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून या स्फोटामागील अन्य सूत्रदारांची नावेही त्याच्याकडून समजण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.





