Pimpri : पवना नदीपात्रात आढळले मृत मासे

पिंपरी : थेरगाव येथील केजुदेवी बंधा-यातून पवना नदीपात्रात पडणा-या पाण्यात बुधवारी (दि. १९) प्रचंड पांढरा फेस तयार झाल्यामुळे पुन्हा जल प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच नदीपात्रात मृत मासे आढळून आले आहेत. नदीपात्रातील रसायन मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातून पवना नदी वाहते. थेरगाव येथील केजुदेवी बंधारा येथे नेहमीच पाण्यावर पांढरा फेस तयार होतो. नदीपात्राच्या पश्चिमेकडील भागात रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचे प्रकार पालिकेने निदर्शनास आणले होते. संबंधितांवर कारवाई करुन देखील पुन्हा नदीतील पाणी फेसाळत असल्याचे समोर आले आहे.
त्याची ठोस कारणे शोधून संबंधितांवर महापालिकेकडून कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारामुळे नदीपात्रातील जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. आज पुन्हा येथे नदीतील पाण्यात मृत मासे आढळून आले आहेत. यापूर्वीही अनेकदा मासे मृत पावल्याची उदारणे ताजी आहेत. तरी देखील पालिकेकडून या सर्व प्रकरणाशी कारणीभूत असणा-यांवर कारवाई केली जात नसल्याची शोकांतिका आहे.
नदी प्रदूषणाचा गंभीर मुद्दा सतावत असताना महापालिकेकडून याप्रकरणी गंभीर दखल घेतली जात नाही. पवना असेल किंवा इंद्रायणी या दोन्ही नदीपात्रातील पाण्यात पांढरा फेस तयार होऊन जलचर नष्ट होत चालले आहेत. यावर कठोर पाऊले उचलण्यासाठी महापालिकेने याची गांभिर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.





