David Lammy : ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी काल दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये ते दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांचा आढावा घेणार आहेत. लॅमी यांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली. आपल्या भेटीदरम्यान लॅमी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेणार आहेत.
दोन्ही देशांनी महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप दिल्यानंतर एका महिन्याहून अधिक काळातच लॅमी यांची नवी दिल्ली भेट झाली आहे. त्यांच्या भेटीत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नवी दिल्लीच्या संभाव्य दौऱ्यासाठी पार्श्वभुमी तयार करण्यावरही भर दिला जाईल अशी माहिती आहे.
दिनांक ६ मे रोजी अंतिम झालेल्या एफटीएमुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीला शुल्कातून सूट मिळण्याची अपेक्षा आहे आणि ब्रिटिश कंपन्यांना तेथील उत्पादने भारतात निर्यात करणे सोपे होईल. युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने अंतिम केलेला सर्वात मोठ्यामुक्त व्यापार करारासोबतच दोन्ही बाजूंनी दुहेरी योगदान करारावरही शिक्कामोर्तब केले आहे.





