मंत्रिमंडळ विस्ताराकडे दौंडकरांची ‘टक’

वर्षानुवर्षे दौंडकरांना मंत्रिपदाचे फक्त गाजरच

पुणे – दौंड हा धर्मनिरपेक्ष तालुका म्हणून ओळखला जातो. येथे पवार ज्याच्या खांद्यावर हात ठेवतात तो उमेदवार निवडून येतो हा इतिहास आहे. मात्र या इतिहासाला दौंड तालुक्यातील जनतेने छेद देत 2014 ला रासप आणि 2019 ला भाजपच्या चिन्हावर आमदार राहुल कुल यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. 2019 ला भाजपच्या चिन्हावर उमेदवार निवडून देण्याचे धाडस जर कोणी केले असेल तर ती दौंडची जनताच आहे. मात्र हीच दौंडची जनता आता भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयाकडे टक लावून बसली आहे.
दौंड तालुक्यात भाजप फार पूर्वीपासून कार्यरत आहे. मात्र या पक्षाला कधीच मोठे यश या तालुक्यात आले नाही. मात्र यावेळी तालुक्यातील जनतेने केवळ आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व झुगारून आपल्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे राहून बारामती आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला शह देण्याचे काम केले आणि पहिल्यांदाच या तालुक्यात भाजपच्या चिन्हावर येथील आमदार निवडून दिला.मंत्रिमंडळ विस्तार होताना भारतीय जनता पक्षाला दौंडचा विचार करावा लागणार आहे.
कारण वर्षानुवर्षे दौंडकरांना विविध पक्षांनी मंत्रिपदाचे फक्त गाजरच दाखविले आहे. जर भाजप नेतृत्वाने यावेळी दौंड तालुक्याची दखल घेतली नाही तर मात्र याचा फटका भाजप पक्ष वाढवत असलेल्या तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते नेतेमंडळीपर्यंत बसल्याशिवाय राहणार नाही. दौंड तालुक्यातील जनता गेली 40 वर्षे कुल घराण्यावर विश्वास ठेऊन त्यांना निवडून देत आली आहे. एवढे करूनही जर यावेळी आमदार राहुल कुल यांना दिले गेलेले आश्वासन भाजपने पाळले नाही तर मात्र या जनतेचा सहनशीलतेचा बांध तुटल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपच्या चिन्हावर यापुढे कोणी निवडून येईल कि नाही याची शास्वतीही देण्यात येणार नाही अशी चर्चा दौंड तालुक्यातील विविध गावांतील पारांवर ऐकायला मिळत आहे.
माजी आमदार रमेश थोरात यांच्या राजकारणाचा पाया विविध सहकारी संस्थांवर आधारलेला आहे. यामधूनच माजी आमदार यांचे चिरंजीव तुषार थोरात यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. रमेश थोरात आणि दिवंगत आमदार सुभाषअण्णा कुल ही जोडी सन 1990 नंतर जिल्ह्यात खूपच फेमस झाली. या दोघांमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत झाले. सुभाष कुल यांच्या निधनानंतर कुल कुटुंबीय व थोरात यांच्यातील दरी वाढत गेली. रमेश थोरात यांनी त्यांच्या मुलाकडे राजकारणाची सुत्रे अद्याप बहाल केलेली नाहीत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुल विरुद्ध थोरात अशी पारंपरिक लढत होणार की परंपरा खंडित होणार याकडे दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
…तर भाजपला जनताच उत्तर देईल
आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला शह देऊन पवारांच्या लाटेतही भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार राहुल कुल यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला रोखायचे असेल तर या उमद्या नेतृत्वाला यावेळी संधी देऊन दौंडला मंत्रिपद द्यावेच लागेल. अन्यथा पुणे जिल्हा जिथे भाजपच्या हातातून गेला तिथे फक्त दौंड तालुकाच का? तरला याचे उत्तर आगामी काळात भाजपला येथील जनता दिल्याशिवाय राहणार नाही.





