दौंड विधानसभा निवडणूक: पुन्हा राहुल कुल – रमेश थोरात आमने-सामने

दौंड – दौंड विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या अर्धा तासांमध्ये राजकीय उलथापालथ होऊन रंगतदार बनली असून तिरंगी चौरंगी वाटणारी ही निवडणूक अखेरीस कुल व थोरात यांच्या भोवतीच केंद्रित झाली.
दौंड विधानसभेसाठी 22 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी दोन जणांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 4) सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता दौंड विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार राहुल कुल व राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्या सह 14 उमेदवार रिंगणात आहेत.
महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरलेले वीरधवल जगदाळे हे निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती. मात्र महायुतीमध्ये बिघाडी नको म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीकडून दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीतून माघार घेणार नाही असे जाहीर केले होते मात्र माजी आमदार रमेश थोरात यांनी केलेली मनधरणी यशस्वी ठरले आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर राजाराम तांबे व वसंत साळुंखे जरांगे समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच अपक्ष असलेले सुमन म्हस्के व संदीप आढाव यांनी देखील नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे दौंड विधानसभेचे निवडणूक अटीतटीची होणार असून आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.




