Nevase News : जमीन घेण्यासाठी तगादा, सुनेला सासरच्या लोकांकडून मारहाण; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Nevase News : लग्नानंतर दोन महिन्यांपासून सासरचे लोक हुंडा म्हणून माहेरहून १० लाख रुपये आणि जमीन घेण्यासाठी मला तगादा लावून माझा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

नेवासे : जमिनीसाठी माहेरहून १० लाख रुपयांची मागणी करत सासरच्या १६ जणांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात विवाहितीने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवाहितेने सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, लग्नानंतर दोन महिन्यांपासून सासरचे लोक हुंडा म्हणून माहेरहून १० लाख रुपये आणि जमीन घेण्यासाठी मला तगादा लावून माझा शारीरिक व मानसिक छळ करत होते.
फिर्यादी महिलेने तक्रारीत ५ एप्रिल २०२४ रोजी महेश दरंदले यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांपासूनच सासरचे लोक हुंडा म्हणून १० लाख रुपये आणि जमीन घेण्यासाठी वारंवार त्रास देऊन छळ करत होते. असा आरोप केला आहे. यासोबत १० ऑक्टोबर २०२४ रोजी या विवाहितेला धमकी दिली की, “तुझ्या माहेरच्यांनी पैसे द्यावेत, नाहीतर तुला माहेरी पाठवू.” यानंतर वेळोवेळी पीडितेला मारहाण करून तिचा छळ करण्यात आला.
३० नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले असेही या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, नेवासे पोलिसांनी महेश दरंदले, सासरे नामदेव दरंदले, सासू लता दरंदले यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.
विवाहितेच्या घरच्यांना नवरदेव पुणे येथे आयटी कंपनीत नोकरीला असल्याचे सांगून लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत पुन्हा गावी येऊन शेती करत असल्यामुळे फसवणूकीचा प्रकार आता उघडकीस आला आहे. माहेरून आणखी शेती घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत या विवाहितेचा छळ केल्याचे या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.





