Dattatray Bharne : दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार; म्हणाले.. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांचा पाठिंबा

पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खांदेपालट झाला असून, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी 5 ऑगस्ट रोजी राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी माणिकराव कोकाटे यांना विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कृषीमंत्रीपदावरून हटवण्यात आले होते.
त्यांच्या जागी अजित पवार गटाचे निष्ठावान नेते दत्तात्रय भरणे यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पदभार स्वीकारताच भरणे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पदभार स्वीकारताना भरणेंचे शेतकऱ्यांना आश्वासन
दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी शेतीच्या प्रत्येक पैलूशी परिचित आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी आणि अपेक्षा मला समजतात. या मंत्रिपदाच्या माध्यमातून मला त्यांच्या हक्कांसाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.”
भरणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे की, राज्यातील प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या. मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन,” असे फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, पदभार स्वीकारताच भरणे यांनी कृषी विभागातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून (MPSC) उत्तीर्ण झालेल्या 14 उमेदवारांच्या नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी करून आपल्या कामाला सुरुवात केली. यामुळे कृषी विभागातील रिक्त पदे भरण्यास गती मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम सेवा मिळण्यास मदत होईल.
कोण आहेत दत्तात्रय भरणे?
दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भरणे सध्या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने बळ मिळाले ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात, जेव्हा त्यांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली.
त्यानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरही अजित पवारांनी त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले. आता माणिकराव कोकाटे यांच्या विधान भवनातील रम्मी खेळण्याच्या प्रकरणामुळे आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेऊन दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
राजकीय प्रवास
दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मतदारसंघात आपला मजबूत जनाधार निर्माण केला आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणापासून सुरुवात करत त्यांनी आपल्या कार्यशैलीने आणि अजित पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेने पक्षात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे आणि पक्षनिष्ठेमुळे अजित पवार यांनी त्यांना सातत्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.





