Dattatray Bharne : 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती
राज्यातील 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी दिली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी विधानसभेत दिली.

Dattatray Bharne : राज्यातील 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी दिली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी विधानसभेत दिली. तसेच, संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी सभागृहात दिली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी नियम 293 अन्वये शेतकऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा सुद्धा झाली. या चर्चेला दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी बुधवारी उत्तर दिले. भरणे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. ही कर्जमाफी पूर्वीच्या 2009, 2017 आणि 2019 या वर्षांच्या कर्जमाफी योजनांच्या तुलनेत अधिक व्यापक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या ज्या काही सुधारणा आणि सूचना असतील, त्यांचाही यात सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत (Dattatray Bharne) शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मंत्री म्हणाले, खरीप हंगामासाठी राज्याला 42 लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि 28 लाख टन बियाणे उपलब्ध झाले असून राज्यात कोणताही तुटवडा नाही. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने (उदा. विनाअनुदानित खते किंवा कीटकनाशके) घेण्याची सक्ती (लिंकिंग) करणाऱ्या दुकानदारांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी 1800 233 4000 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधावा. खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे ॲपद्वारे खत बुकिंगचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वीपणे राबवला जात आहे, असे सांगितले.






