हिंगोली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या हिंगोली कार्यालयातील कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद संभाजी दहिफळे (रा. चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला १०,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मृत कामगाराच्या विमा क्लेम प्रकरण मंजूर करण्यासाठी त्याने ५०,००० रुपयांची लाच मागितली होती. ही कारवाई मंगळवारी हिंगोली शहरात झाली. एका २९ वर्षीय तक्रारदाराने आपली आई आणि चुलत मामा यांच्या निधनानंतर विमा प्रकरण मार्गी लावण्यासाठी दहिफळेकडे अर्ज केला होता. यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. मंगळवारी दहिफळेने तक्रारदाराकडून १०,००० रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनोद शेख, विजय शुक्ला, भगवान मंडलिक, गजानन पवार, रवींद्र वरणे, पुंडगे, वाघ, जाधव आणि शेख अकबर यांच्या पथकाने केली. हिंगोली एसीबीने शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाच मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.