दिली जात होती “करोना’ची माहिती : पालिकेकडून तांत्रिक सुधारणेचे कारण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये “करोना’बाबतच्या आकड्यांमध्ये विसंगती, चुका यामुळे सर्वत्र टीका होत असतानाच आता महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणारा “डॅशबोर्ड’ही बंद केला आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर “डॅशबोर्ड’च्या माध्यमातून नागरिकांना “करोना’चे आकडेवारी, सद्यस्थिती याबाबत माहिती मिळत होती. परंतु महापालिकेकडून प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन प्रेसनोटमध्ये चुकांचा भडीमार, कधीही वेळेचे पालन न होणे हा नित्यक्रम बनला होता. यामुळे पालिकेचा “डॅशबोर्ड’ हा सद्यस्थिती जाणून घेण्याचे चांगले साधन होते, परंतु पालिकेने हा “डॅशबोर्ड’ बंद करुन “करोना’बाबतची माहिती लपविण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे आरोप होत आहेत. तांत्रिक सुधारणेसाठी हे “डॅशबोर्ड’ बंद केले असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आता या डॅशबोर्डचा वापर केवळ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांपुरताच ठेवण्यात आला आहे.
करोनाबाबतची ताजी माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर “डॅशबोर्ड’ बनविला आहे. संबंधित डॅशबोर्डवर दररोज बाधित होणाऱ्या करोना रुग्णांबाबतची माहिती, किती रुग्णांच्या चाचण्या झाल्या, किती रुग्णांना घरी सोडले, रुग्णांचा वाढत असलेला आकडा, त्याबाबतचा चढता आलेख, होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची माहिती, रुग्णालयनिहाय स्थिती, आत्तापर्यंत झालेल्या करोना चाचण्या आदींबाबतची माहिती डॅशबोर्डवर देण्यात येत होती. मात्र, हा डॅशबोर्ड आता नागरिकांसाठी खुला ठेवलेला नाही.
केवळ महापालिका अधिकारी व कर्मचारी लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून या डॅशबोर्डचा वापर करू शकणार असल्याचे महापालिका संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पाहण्यास मिळाले. त्यामुळे “डॅशबोर्ड’ सर्वसामान्यांसाठी बंद करण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, तांत्रिक सुधारणेसाठी हा डॅशबोर्ड बंद केला आहे. संबंधित डॅशबोर्ड हा कार्यालयीन अंतर्गत व्यवस्थापनासाठी केला होता. नागरिकांना करोनाबाबत आवश्यक माहिती सोशल मीडियावरून दिली जात आहे. फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांचा त्यासाठी वापर केला जात आहे. त्याशिवाय, महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील आवश्यक माहिती दिली जात आहे.
सुधारले होते “डॅशबोर्ड’चे अपडेटिंग
सुरुवातीच्या काळात “डॅशबोर्ड’ अपडेट होत नव्हता. परंतु नंतर मात्र “डॅशबोर्ड’चे अपडेटिंग सुधारले होते. “डॅशबोर्ड’वर नागरिकांना “करोना’बाबतची सर्व सद्यस्थिती कळू शकेल, अशी इत्यंभूत आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करुन दिली जात होती. त्यात बाधित रुग्णांचे आकडे, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण, शहरातील रुग्णालयांमध्ये “करोना’साठी उपलब्ध असलेले बेड्स, ग्राफिक्स अशी माहिती देण्यात येत होती. परंतु तेही अचानक बंद करण्यात आले आहे.