Dasara Melawa : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं अचानक ठिकाण बदललं; आता ‘या’ ठिकाणी होणार मेळावा

मुंबई: शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हा मेळावा केवळ मुंबई, ठाणे आणि एमएमआर परिसरातील शिवसैनिकांसाठी आयोजित केला जाणार असून, राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. यावर्षी मेळाव्याचे स्वरूप भव्य न ठेवता, शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी निधी संकलनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून, सुमारे 60 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांना मदत करताना कोणत्याही अटी किंवा नियमांचा अडथळा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जिथे संकट, तिथे शिवसेना,” या आपल्या ब्रीदवाक्यानुसार शिंदे यांनी पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “आम्ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या भावनेने काम करतो,” असे शिंदे म्हणाले. यंदाच्या मेळाव्यामुळे शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
शिवसेनेचा तिसरा मेळावा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. पहिला दसरा मेळावा हा बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर झाला होता. दुसरा मेळावा हा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदाच्या तिसरा मेळावा हा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. महापालिका निवडणुकींच्या अगोदर हा मेळावा येत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





