लाखणगाव- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील शेतकरी नामदेव टिंगरे यांना उसाच्या शेताच्या कडेला सोमवारी (दि. 26) सकाळी बिबट्या दिसल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी बाबाजी करंडे आणि कान्हु करंडे यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक येथील पारगाव-लाखणगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये शेतकरी नामदेव टिंगरे यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी मोबाइलच्या सहाय्याने बिबट्याचे चित्रीकरण केले आहे. लाखणगाव येथील सतीश रोडे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला होता. परिसरात कायमच बिबट्याची दहशत असते. बिबट्याचा बंदोबस्त वनखात्याने करावा. तसेच जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.