‘सांग कुठं ठेवू माथा कळलचं नाही…’

मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन
येरवडा – येरवडा येथील पांडवकालीन तारकेश्वर मंदिराचा परिसर पहिल्या श्रावणी सोमवारी शिवभक्ताविना सुनासुना राहिला. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, त्यामुळे तारकेश्वर टेकडीवरील प्रसिद्ध पांडवकालीन महादेवाचे मंदिर शिवभक्तांसाठी बंदच होते.
श्रावणी सोमवार असल्याने भाविक टेकडी चढून दर्शनासाठी आले होते. मात्र, मंदिराचे दार बंद असल्याने बाहेरून हात जोडून दर्शन घेतले. भक्तांसाठी मंदिर बंद असले तरी देवळातील पूजाअर्चा नेहमीप्रमाणेच करण्यात येत आहे.
श्रावणी सोमवारच्या दिवशीही पूजा अर्चा, अभिषेक करण्यात आला तसेच शिवलिंगाला फुलांची सजावट करण्यात आली, अशी माहिती मंदिराचे पुजारी देवदत्त येरवडेकर व रमाकांत भोपे यांनी दिली.
शासनाने आदेश दिल्यावरच भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येईल, अशी माहिती समस्त गावकरी मंडळ ट्रस्ट येरवडाचे सेक्रटरी सुहास राजगुरू यांनी दिली.





