पुणे | धोकादायक झाडे ; महापालिकेस कळवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात पावसाळी हंगामाच्या आधीपासूनच वादळी अवकाळी पाऊस होतो. तसेच, पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर खासगी मिळकतींमध्ये वृक्ष तसेच वृक्षांच्या फांद्या पडतात. यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा होण्यासह जिवितहानी होण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी अशी धोकादायक झाडे काढण्यासाठी महापालिकेची परवानगी घेऊन ती काढण्यात यावीत तसेच अशा झाडांची माहिती महापालिकेस तत्काळ कळवावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
शहरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा वादळी पाऊस होतो. त्यामुळे, महापालिकेकडून एप्रिल महिन्यापासूनच शहरातील धोकादायक झाडे काढण्यात येतात. मात्र, खासगी मिळकतींमधील झाडे महापालिका काढत नाही. ही झाडे संबंधित जागा मालकांनाच काढावी लागतात. त्यामुळे झाड जळाले असेल किंवा त्यावर रोग पडला असेल किंवा वादळवारा, आग, वीज किंवा मुसळधार पाऊस यामुळे पडण्याची शक्यता असते.
मात्र, अनेकदा नागरीक महापालिकेस कल्पना देत नाहीत तर काही नागरीक परस्परच झाडाचा निपटारा करतात ही बाब बेकायदेशीर असल्याने धोकादायक वृक्ष काढणे, फांद्या छाटण्याच्या परवानगीकरिता पावसाळी हंगामामध्ये पडलेल्या वृक्षांच्या फांद्या, वृक्ष त्वरित हलविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचे संबंधीत क्षेत्रीय कार्यालयाकडील वृक्ष अधिकारी यांच्याशी त्यांचे मनपा संकेतस्थळावरील भ्रमणध्वनी द्वारे तसेच अग्निशमन विभाग-संपर्क १०१, ०२०-२६५६१७०६, ०२०-२६४५१७०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी केले आहे.





