पुणे – स्थानिक रहिवाशांच्या जीवीतास धोका निर्माण करत दोघांनी सासोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस लावण्याचा प्रकार घडला. दरम्यान, याबाबतचा जाब सोसायटीतील रहिवाशांनी रेस करणार्यांना विचारला असता, त्यांनी रहिवाशांनाच अरेरावीची भाषा केली. रेस करणारे दोघे तरुण त्या सोसायटीत वास्तव्यास नाहीत. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोली येथील न्याती एलन सोसायटीत बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी, वाघोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, श्रेयस गोरे (१९), साहिल गोरे (२०,राहणार दोघे गोरे वस्ती) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे न्याती एलन ही सोसायटी आहे. या सोसायटीत दोघांनी बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाडीची रेस केली. हा प्रकार इमारतीच्या छतावरून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. त्यामध्ये दोन गाड्या एका ठिकाणी थांबून वेगात धावत आहेत. गाड्या पळवून झाल्यानंतर सोसायटीतील काही व्यक्तीनी थार गाडी चालविणार्या तरुणास थांबवून जाब विचारला. त्यावेळी त्याने उद्धटपने वर्तन करत अरेरावीची भाषा केली. सोसायटीतील व्यक्तीने म्हटले या ठिकाणी आमची मुले खेळतात, त्यावेळी गाडीतील तरुण म्हणतो कुठं खेळत्यात मुलं, ही काय खेळायची जागा आहे का? याबाबतचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच वाघोली पोलिस दोघा तरुणांना पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करत दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.