प्रख्यात नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन

नवी दिल्ली : प्रख्यात नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यशैलीतील दिग्गज म्हणून त्यांची ओळख होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यामिनी यांना दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील ७ महिन्यांपासून त्यांच्यावर रूग्णालयाच्या अति दक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू होते.तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आंध्रप्रदेशात जन्मलेल्या यामिनी यांना बालवयापासूनच नृत्याविषयी रूची होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी नृत्याचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. नृत्यशैलीतील उल्लेखनीय योगदानामुळे अवघ्या २८ वर्षी म्हणजे १९६८ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले. त्यानंतर २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यांनी देश-विदेशांत नृत्याचे अनेक कार्यक्रम सादर केले. नृत्यशाळेच्या माध्यमातून नृत्यशैलीचा प्रसार केला. यामिनी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले. एक युग समाप्त झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.





