पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना व डीजे डान्सर गौतमी पाटील यांच्या नावावर नोंदणीकृत कीया कंपनीच्या कारने मुंबई-बंगळूरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक येथे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, रिक्षातील दोन प्रवासीही जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालकाने कारसह फरार होण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंहगड रस्ता पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला ताब्यात घेतले आहे. हा अपघात मंगळवारी (३० सप्टेंबर) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल विश्वासच्या समोर घडला आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गौतमी पाटील यांच्या कीया कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की रिक्षा रस्त्यावर उडाला आणि त्याचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे (वय ४४ वर्षे, रा. सिंहगड रस्ता, पुणे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर, अंगावर जखम आणि अंतर्गत दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रिक्षेत दोन प्रवासी देखील होते, जे सौम्य जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमींना जवळच्या धायरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मरगळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या सर्जरी आणि इंटेंसिव्ह केअर सुरू आहे. प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपघातानंतर कारचालकाने कारसह घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने सिंहगड रस्ता पोलिसांनी केवळ ३ तासांत त्याला धायरी परिसरातून अटक केली. कार जप्त करण्यात आली असून, चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.