Rain : धरण तुडुंब, नदी-नाले ओसंडून वाहताहेत तरी खरेदी करावे लागतेय पाणी
भर पावसाळ्यातही शहरात पाणी टंचाई तीव्र

पिंपरी – पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण होत आले आहेत. या काळात कोरड्या दिवसांची संख्या अधिक होती. परंतु जितके दिवस पाऊस पडता तो वर्षभराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पुरेसा होता. शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरले असून धरणातून विसर्ग देखील सुरू झाला आहे.
शहरातील वाहणाऱ्या तीनही नद्या, ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. दिवस-दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे, सर्वत्र हिरवळ आणि पाणी दिसत असताना देखील पिंपरी-चिंचवडकरांना मात्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. शहरातील अनेक सोसायट्यांना भर पावसातही पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून नागरिकांवर एक दिवसाआड पाणी कपात लादण्यात आली. सुरू करण्यात आला आहे. समान पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या नियोजनासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, जो मागील साडेसहा वर्षांपासून सतत सुरू आहे. त्यानंतर पावसाळा लांबल्यामुळे यावर्षी आणखी १५ टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली. धरणे तुडुंब भरलेली असूनही आणि नदी-नाले ओसंडून वाहत असतानाही लोकांना पाणी खरेदी करावे लागणे हा एक मोठा विरोधाभास आहे.
संपूर्ण शहरात पाणीबाणी
हा गंभीर प्रश्न आपल्या जलव्यवस्थापनातील त्रुटी आणि पायाभूत सुविधांच्या अभावावर बोट ठेवतो. धरणात पाणी असले तरी ते घराघरांपर्यंत पोहोचवणाऱ्या जलवाहिन्या जुन्या आणि खराब झाल्या आहेत. वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे शहरांमधील शेवटच्या टोकापर्यंत किंवा उंचावर असलेल्या भागांना अपुऱ्या दाबाने पाणी मिळत होते.
परंतु आता संपूर्ण शहरातच पाणी टंचाई तीव्र झाली आहे. अगदी महापालिका भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोसायट्यांना देखील पाण्याचे टॅंकर विकत घ्यावे लागत आहेत. सोसायट्यांवर पाण्याचे टॅंकर आता एक मोठा आर्थिक भार बनला आहे.
वाढते काँक्रिटीकरण आणि टँकर लॉबी
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. विहिरी आणि बोअरवेल लवकर कोरड्या पडतात. काही भागांत टँकर चालकांच्या नफ्यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, ज्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी खरेदी करावे लागते.
उपाययोजनांची गरज
पाणी गळती रोखण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलणे. गढूळ पाण्यावर वेगाने प्रक्रिया करणाऱ्या आधुनिक यंत्रणा बसवणे. इमारतींमध्ये पावसाचे पाणी साठवणे आणि जमिनीत मुरवणे बंधनकारक करणे, अशा दीर्घकालीन उपाययोजनांची गरज सध्याची पाणी टंचाई सुचवित आहे.
Bhosari MIDC: भोसरी एमआयडीसीत वाढत्या चोर्या; अपुरी प्रकाशव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर





