पुणे जिल्हा | ओलसर कपडे फंगल इन्फेक्शनाचे कारण

बारामती, (प्रतिनिधी)- सध्या पावसाळा सुरू आहे, आणि संततदार पाऊस पडतो आहे, पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने कपडे लवकर सुकत नाहीत, अनेकजण असेच ओले कपडे वापरतात.
त्यामुळे फंगल इन्फेक्शन किंवा गजकरणाचा त्वचारोगाचा धोका अधिक वाढतो, यामध्ये जांग, काख, बसण्याची जागा यामध्ये सततच्या ओलसरपणामुळे गोल रिंग आकाराचे लाल रंगाचे प्रचंड खाजवणारे चट्टे अंगावर उठायला सुरुवात होते, हे इन्फेक्शन संसर्गजन्य आहे, हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरते, अशी महिती बारामती येथील त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. गौरी देवकाते यांनी दिली.
पावसाळ्यात काय काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे तसेच अर्धवट स्वरूपातील वाळलेले कपडे दररोजचे ओले अंतर्वस्त्र वापरल्यामुळे गजकर्णाचा धोका वाढतो,
कपडे अंतर वस्त्र पूर्ण सुकल्याशिवाय वापरू नयेत, कपडे गरम पाण्यामध्येच धुऊन, इस्त्री करून वापरल्यास अधिक फायदेशीर ठरते, कोरडे आणि सैल कपडेच वापरावेत, एकमेकाचे कपडे, साबण, टॉवेल याचा वापर करू नये,
समाजमाध्यम पाहून औषधे घेऊ नका
डॉ. देवकाते म्हणाल्या की, रुग्णांनी टीव्ही, युट्युब, समाजमाध्यमावरील जाहिराती पाहून किंवा विविध औषध दुकानातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेऊन वापरणे टाळावे, औषधामध्ये स्टेरॉईडचा अंश असण्याची शक्यता अधिक असते, यामुळे खाज तात्पुरती कमी होईल.
परंतु इन्फेक्शन त्वचेच्या आत मध्ये वाढत राहील, त्वचेचे इन्फेक्शन असेल तर एमसीआय ओआर आयएडीव्हीएल मान्यताप्राप्त त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य तो उपचार करून घ्यावे, अशी महिती त्वचारोग तज्ञ गौरी देवकाते यांनी दिली आहे.





