हरकतींच्या सुनावणीसाठी नोटीस देताना दमछाक

पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तब्बल 5684 हरकती घेण्यात आल्या आहेत. या अर्जदारांना सुनावणीसाठी नोटीस देताना निवडणूक विभागाची दमछाक झाली आहे. प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस देणे आवश्यक असताना अर्जदारांना फोन करून नोटीस घेऊन जाण्याचे सांगण्यात आले.
ज्या नागरिकांनी हरकत घेतली आहे त्यांना सुनावणीसाठी घरोघरी लेखी नोटीस पाठवणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांनी हरकत घेतली आहे त्यांना फोन करून महापालिकेत बोलावण्यात आले. तिथे येऊन तुम्ही तुमच्यासाठीची नोटीस घेऊन जा असे सांगितले.
वेळेअभावी अनेक नागरिकांना ते शक्य नाही. त्यामुळे बहुतांश नागरिकांना नोटीस वेळेत मिळाल्या नाहीत. परिणामी सुनावणीसाठी नागरिक उपस्थित राहणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने सर्व अर्जदारांना नोटीस देताना निवडणूक विभागाची दमछाक झाली असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.





