पुणे जिल्ह्यात अवकाळीने कोटींचे नुकसान

पुणे – जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यांत चांगलीच दैना केली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्यात पिंपळी लिमटेक येथे नीरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने हे पाणी शेतीत आणि नागरी वस्तीत शिरले आहे. अवकाळीने जिल्ह्यात सुमारे २०० ते ३०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पाऊस ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा आकडा समजू शकणार आहे.
बारामती तालुक्यात अवकाळीने दाणादाण केली आहे. शहरात ओढ्याला नदीचे स्वरूप आले होते. भोर तालुक्यात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव हिरडा पिकांसह तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यात डाळिंब पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात आंबा पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील कोणताही शेतकरी सुटला नाही. इतकी भीषण स्थिती अवकाळीमुळे झाली आहे. दौंड तालुक्यात अवकाळीने वाताहात केली आहे. दौंड शहरात घरपडीची घटना घडली आहे. तर मनमाड- सांगली महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.





