Dairy Farm Flyover : रेल्वे फाटकाचा जाच कायमचा संपणार! डेअरी फार्म उड्डाणपुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट
Dairy Farm Flyover : रेल्वे गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात; पिंपळे सौदागर ते पिंपरी प्रवास आता सिग्नलमुक्त आणि वेगवान होणार.

Dairy Farm Flyover : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाच्या कामाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पाला गती मिळाली असून, रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे गर्डर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या महिला अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या पुलाचे सर्वात जटिल काम असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील स्टील गर्डर बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात आला आहे.
नियोजनबद्ध पद्धतीने दररोज गर्डर बसवून त्यांची जोडणी केली जात आहे. त्यानंतर स्लॅब टाकणे, डांबरीकरण आणि अंतिम फिनिशिंगची कामे जलदगतीने पूर्ण केली जाणार आहेत. पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी कॅम्प परिसरातून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी डेअरी फार्म मार्ग अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, रेल्वे फाटकामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. रोजच्या कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जात होते.
आता १,२९० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह अखंड राहणार असून, परिसरातील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, वृक्षतोड, तांत्रिक परवानग्या आणि रेल्वे विभागाच्या मंजुरी प्रक्रियेमुळे कामात अडथळे आले. अनेक अडचणींवर मात करत आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महापालिका स्थापत्य विभागाच्या माहितीनुसार, उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करून एप्रिलअखेर नागरिकांसाठी पूल खुला केला जाणार आहे. या पुलामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुलाची वैशिष्ट्ये एका नजरेत:
-एकूण लांबी: १२९० मीटर
-पुलाची रुंदी: १७.२० मीटर
-एकूण गर्डर: ७ स्टील गर्डर
-अपेक्षित वेळ: एप्रिल २०२४ अखेर





