प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर उपचाराची व्यवस्था…; वाचा आजच्या Top 10 News

‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा-
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत, सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होणे शक्य नसल्याचा थेट सवाल उपस्थित केला आहे. योजनांच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर डल्ला मारणे आणि सरकारी तिजोरी रिकामी करणे ही भाजपा-मिंधे गटाची जुनी खोड असून, मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा लुटला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार-
आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीत राहूनच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्रास होणार नाही. महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. तसेच महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केले पाहिजे, अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर उपचाराची व्यवस्था-
राज्यातील कर्करुग्णांना अद्यावत उपचार मिळावे म्हणून शासन प्रभावी धोरण करत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर उपचाराची व्यवस्था सक्षम केली जात आहे. तर नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे अद्यावत कॅन्सर रुग्णालय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयातील अपूर्ण इमारतीला निधी देऊन हे कर्करोग रुग्णालयही अद्यावत केले जाईल. तर राज्यातील सर्व कर्करुग्णांवरील केंद्र एक- मेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विकासनिधीच्या नावाखाली मतांची खरेदी-
राज्यात महायुती सरकारकडून फक्त सत्ताधारी आमदारांनाच निधी वाटप केल्याच्या आरोपांवरून विरोधकांचा संताप उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर “लोकशाहीची थट्टा” केल्याचा आरोप करत, हा प्रकार म्हणजे “मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड” असल्याचे म्हटले आहे.
लोकपाल सदस्यांना 70 लाखांची BMW
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी लढा लढला. आम्ही खूप झगडलो. संघर्ष केला. त्यातून लोकपाल पुढे आला. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो. पण त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती फार दुर्दैवी गोष्ट आहे, असे अण्णा हजारे गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणालेत.
तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राजद प्रमुख तेजस्वी यादव असतील. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. गेहलोत म्हणाले की तेजस्वी यादव आमचे नेते आहेत. एनडीएने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करावे. दरम्यान ६ आणि ११ नोव्हेंबर ला मतदान होणार असून १४ नोव्हेंबर ला निकाल जाहिर होणार आहेत.
कर्नाटकात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे वगळली-
कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने केलेल्या मतचोरीच्या आरोपांबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. वृत्तानुसार, पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मतदार यादीतील अनियमिततेची चौकशी करताना असे आढळून आले की एका डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येक मतदाराचे नाव बनावट पद्धतीने वगळण्यासाठी ८० रुपये मिळाले. एसआयटीनुसार, डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान आळंद मतदारसंघात ६,०१८ मतदार नोंदणी रद्द करण्याचे अर्ज प्राप्त झाले. याचा अर्थ डेटा सेंटर ऑपरेटरला एकूण ४.८ लाख रुपये देण्यात आले. एसआयटीने कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एक डेटा सेंटर देखील ओळखले जिथून मतदार नोंदणी रद्द करण्याचे अर्ज पाठवण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १८ सप्टेंबर रोजी दावा केला की मुख्य निवडणूक आयुक्त मतांची चोरी आणि मत वगळण्याचे काम करत आहेत.
ट्रम्प म्हणाले- भारत डिसेंबरपर्यंत रशियन तेल खरेदी थांबवेल-
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले की भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी हळूहळू कमी करत आहे आणि वर्षाच्या अखेरीस ती जवळजवळ बंद करेल. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांना याची खात्री दिली होती. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “तेल खरेदी ही अशी गोष्ट आहे जी लगेच थांबणार नाही, परंतु वर्षाच्या अखेरीस ते शून्यावर आणले जाईल. मी कालच पंतप्रधान मोदींशी याबद्दल बोललो. ही एक मोठी गोष्ट आहे, ती सुमारे ४० टक्के तेलाची आहे.” गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित करण्याची ही पाचवी वेळ आहे.
सेन्सेक्सची ८०० अंकांची पडझड –
शेअर बाजारात गुरूवारी ८०० अंकाची पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. गुंवणुकदारांनी उच्च पातळीवर नफा मिळवण्यासाठी विक्री केल्याने, तसेच संमिश्र जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशकांमध्ये झालेली महत्त्वपूर्ण वाढ गमावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज सेन्सेक्स त्याच्या दिवसातील उच्चांकावरून ८०० अंकांनी घसरून ८४५५६.४० वर स्थिरावला, तर निफ्टी घसरून २५८८८.९० पर्यंत खाली आला.
सिद्धार्थ जाधवचा धडकी भरवणारा लूक-
चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या नव्या चित्रपटाची सिनेरसिकांना मोठी प्रतिक्षा आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. त्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवचा लूक चर्चेत आहे. सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करून त्यातील सिद्धार्थचा लूक समोर आणण्यात आला. या लूकमध्ये सिद्धार्थ जाधव हा आपल्या नेहमीच्या लूकपेक्षा फार वेगळा दिसून येत आहे. चेहऱ्यावर रक्त, जखमांचे व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि नजरेत दडलेले क्रौर्य आदी गोष्टी सिद्धार्थच्या या नव्या लूकमध्ये दिसून येत आहेत. त्याच्या या लूकमुळे त्याची या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका असेल? याविषयी सिनेरसिकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात विजय
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दोन विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांनी अर्धशतके झळकावत ४६.२ षटकांत आठ बाद २६५ धावा करून संघाला सामना जिंकून देत मालिकेत विजयी आघाडी घेतली.





