आजच्या टाॅप-10 बातम्या: नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर….

नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली. या प्रक्रियेनंतर 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर –
गरीब नागरिकांना सणासुदीला दिलासा देणारी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आनंदाचा शिधा’ योजना आता निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवानंतर आता दिवाळीमध्येही ही योजना लागू होणार नसल्याचे समोर येत असून, यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. निधी उपलब्ध न करून योजना बंद पाडण्याचा नवा फॉर्म्युला सरकारने आणला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर –
केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार असून निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत.
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न –
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत असताना एका वकीलाने गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकीलाला पकडले आणि घेऊन गेले. “आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.”, अशी घोषणाबाजी कोर्टातून बाहेर पडताना वकिलाने केली. या घटनेवर सरन्यायाधीश म्हणाले, “या गोष्टीने मला काही फरक पडत नाहीत.”
जयपूर रुग्णालय दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू
जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला. ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोअररूममध्ये रात्री ११:२० वाजता आग लागली, जिथे कागद, आयसीयू उपकरणे आणि रक्त सॅम्पलर ट्यूब साठवले जात होते. ट्रॉमा सेंटरमधील नोडल अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे.
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर –
२०२५ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेतील मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि जपानचे शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आला आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते, यासंबंधीचा खुलासा करणाऱ्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
फ्रान्सच्या पंतप्रधानांचा अचानक राजीनामा –
फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू आणि त्यांच्या सरकारने सोमवारी राजीनामा दिला. लेकोर्नू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा राजीनामा दिला आहे. फ्रान्समधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिला असून याचा परिणाम बाजारात देखील पाहायला मिळाला. ज्यामुळे शेअर्स आणि युरो दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. अवघे २७ दिवसच ते पदावर राहिले.
शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात जोरदार –
भारतीय शेअर बाजारांनी सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी व्यापारी आठवड्याची सुरुवात जोरदारपणे केली. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी वाढले. सेन्सेक्स ५८२ अंकांनी वधारून 81790 वर पोहोचला, तर निफ्टी 183 अंकांनी वधारून 25077 अंकांवर पोहोचला. आयटी, फार्मा आणि बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
बुद्धिबळ स्पर्धेत भारत पराभूत –
अर्लिंग्टन, टेक्सास येथे झालेल्या ‘चेकमेट: अमेरिका विरुद्ध भारत’ बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेने भारताला 5-0 ने पराभूत केले. हिकारू नाकामुराने डी. गुकेशला हरवले, तर फाबियानो कारुआनाने अर्जुन एरिगेसीला नमवले. नाकामुराच्या वादग्रस्त किंग-फेकण्याच्या कृतीमुळे खळबळ उडाली, पण ती आयोजकांच्या स्क्रिप्टनुसार होती.
सुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर –
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या उत्तराखंडमध्ये आध्यात्मिक यात्रेवर आहे. सोमवारी त्यांनी चमोली येथील बद्रीनाथ मंदिराला भेट दिली. त्यांनी भगवान बद्रीविशालच्या देवतेचे दर्शन घेतले आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने अभिनेत्याचे स्वागत केले.

