पिंपरी | निवडणुकीतील प्रचाराचा दैनंदिन खर्च: यांना निवडणूक आयोगाची नोटीस

पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे व माधवीताई नरेश जोशी या तीन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली आहे. येत्या 48 तासांत अमान्य तफावतीबाबत खुलासा सादर न केल्यास तफावतीचा खर्च मान्य असल्याचे गृहित धरून तो या तीनही उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.3) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडली.
उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार दि. 3 मे रोजी आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता.
या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे.
अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसर्या तपासणीच्या वेळी या निवडणूक खर्चाचे लेखे मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल.
नोटीसमध्ये नमुद तफावत आपल्याला मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश आपल्या खर्च नोंदवहीत करण्यात यावा व तसे सूचित करण्यात यावे, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही नोंदवही व खर्चाचे प्रमाणके उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तपासणीसाठी 3 मे रोजी सादर केले नाहीत, त्यामुळे अशा सहा उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे.
अन्यथा वाहने, सभांची परवानगी रद्द करणार
शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या उमेदवारांचे 48 तासांत खुलासा न मिळाल्यास केल्यास भा. दं. वि. कलम 171 (1) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असेदेखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.





