दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट ! जळगावात गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : मंगळवारी राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र आता या सणाला गालबोट लागणारी बातमी समोर आली आहे. जळगावच्या पाचोऱ्यात दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. पाचोऱ्यात गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे मृत पावलेल्या गोंविंदाचे नाव आहे.
साविस्तर माहिती अशी कि, पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत खाली पडल्याने नितीन पांडुरंग चौधरी हे जखमी झाले होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परिसरात युवकांनी दहीहंडीचं आयोजन केले होते. नितीन चौधरीच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.
मुंबईत 106 गोविंदा जखमी
दरम्यान मुंबईतल्या दहीहंडीमध्ये 106 गोविंदा जखमी झाले. केईएम रुग्णालयात एकूण 10 पेशंट ऍडमिट आहेत, यातले 2 पेशंट डॉक्टरच्या देखरेखीखाली आहेत. तर उरलेल्या 8 पैकी 5 गोविंदांना गंभीर इजा झाली आहे.





