‘पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल’; गळफास घेत आठवीच्या मुलाने संपवले जीवन

Kalyan News| कल्याण पूर्व भागातील चिकणी पाडा येथील एका अवघ्या 13 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विघ्नेश पात्रो (वय 13) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे.
आत्महत्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहिली होती. ज्यातून हे उघड होत आहे.त्याने सुसाईड नोटमध्ये ‘पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. शिक्षिका आणि मुलाने चिडवल्याने मी आत्महत्या करतो,’ असे लिहीत आपलं आयुष्य संपवलं.
विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास लावून आयुष्य संपवले. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
घराची खिडकी उचकटून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह दिसल्यानंतर वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर परिसरातील नागरिक जमले आणि घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीनंतर पालकांनी तक्रार केली असून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिले आहे. Kalyan News|
हेही वाचा:





