Baramati : सुपा-कोऱ्हाळे गटात दादांचा विचार रूजला
Baramati : सुपा गटात कारखान्याचे सलग तीन वेळा संचालकपद भूषविलेले आणि एकदा उपाध्यक्ष राहिलेले सुनील नारायण भगत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश नामदेवराव खोमणे, माजी पंचायत समिती सभापती पोपटराव पानसरे, कारखान्याचे माजी संचालक सचिन खलाटे यांच्यासह एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

वडगाव निंबाळकर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोऱ्हाळे – सुपा गट क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने तिन्ही जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले. या गटातून सुनील नारायण भगत, राजेंद्र हरिभाऊ बोरकर, अक्षय धनंजय खलाटे हे उमेदवार विजयी झाले. आजी-माजी पदाधिकारी आणि अनुभवी नेते आमनेसामने असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते.
सुपा गटात कारखान्याचे सलग तीन वेळा संचालकपद भूषविलेले आणि एकदा उपाध्यक्ष राहिलेले सुनील नारायण भगत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश नामदेवराव खोमणे, माजी पंचायत समिती सभापती पोपटराव पानसरे, कारखान्याचे माजी संचालक सचिन खलाटे यांच्यासह एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
शरद पवार गटाकडून सतीश खोमणे, पोपट पानसरे, शिवराज ऊर्फ प्रवीण पवार यांनी, तर माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलकडून सचिन खलाटे, गोरख खोमणे, अनिल जगताप यांनी निवडणूक लढविली. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.
तिरंगी लढतीत अनुभवी नेतृत्व, स्थानिक राजकीय समीकरणे, सभासदांशी असलेला संपर्क या बाबींची कसोटी लागली. विविध पॅनलच्या उमेदवारांनी विजयासाठी प्रयत्न केले असताना अखेर अजितदादा पवार पॅनलच्या तिन्ही उमेदवारांनी बाजी मारली. या निकालामुळे गट क्रमांक चारमध्ये या पॅनलने आपले स्थान कायम राखल्याचे चित्र स्पष्ट झाले.
विशेषत; सुनील भगत यांच्यासारख्या अनुभवी संचालकासह नवोदित उमेदवार राजेंद्र बोरकर, अक्षय खलाटे यांच्या विजयामुळे या गटातील निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दिग्गज उमेदवारांच्या उपस्थितीत झालेल्या लढतीत मतदारांनी दिलेला कौल आता भविष्यात दिशा देणारा ठरला आहे.
भगत कुटुंबाची ५० वर्षांची परंपरा!
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनील नारायण भगत यांच्या विजयाकडे विशेष लक्ष वेधले. त्यांचा हा संचालक म्हणून चौथा कार्यकाळ असून, कारखान्याच्या संचालक मंडळातील त्यांचा एकूण कार्यकाळ वीस वर्षांचा आहे. अजितदादा पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगत कुटुंबातील सदस्यांचा कारखान्याच्या संचालक मंडळावरील सहभाग ५० वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे भगत कुटुंबाची सहकार क्षेत्रातील दीर्घ परंपरा या विजयाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे.





