दादा, तू कोथरूडमधून दणक्यात निवडून येणार; संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाद

पुणे – दादा, तू कोथरूडमधून दणक्यात निवडून येणार, अशा शब्दांत भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी आशीर्वाद दिले. पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. या अभियानाअंतर्गत विविध सोसायट्यांतील प्रथितयश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन ते मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत.
कोथरूडमधील रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान अरविंद कोल्हटकर यांची पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी ‘दादा, तू दणक्यात निवडून येणार,’ असे आशीर्वाद कोल्हटकर यांनी पाटील यांना दिले. या वेळी भाजपा कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, कोथरूडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, कोथरूड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, युवा मोर्चाचे अमित तोरडमल उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी यांची आज सभा
कोथरूडमधील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची उद्या (शनिवार, १६ नोव्हेंबर) कोथरूडच्या राहुलनगरमधील शनिमारुती मंदिर परिसरात सभा होत आहे. कोथरूडच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाकांक्षी चांदणी चौक इंटरचेंज साकारण्यात गडकरी यांची भूमिका महत्त्वाची होती.
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-बंगळूर या नवीन १४ पदरी महामार्गाच्या कामास येत्या सहा महिन्यांत सुरुवात होत असून, या महामार्गामुळे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती गडकरी यांनी नुकतीच पुण्यात दिली होती. नितीन गडकरी यांचे युट्यूबवर १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. युट्यूबकडून गोल्डन बटन मिळविणारे ते पहिले केंद्रीय मंत्री आहेत. गडकरी यांच्या सभेस कोथरूडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोथरूड दक्षिण मंडलचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी केले आहे.





