Baramati : सोमेश्वर कारखान्याच्या शिवारात ‘दादा गट’
Baramati : माळेगाव येथे सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवार (दि.१२) रोजी सकाळी नऊपासून सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजितदादा पवार पॅनलसमोर पुरुषोत्तम जगताप आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले.

बारामती : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने सभासदांनी कौल देत कारभाराची संधी दिली आहे. मतमोजणीच्या प्रारंभीच अजितदादा पॅनलने आघाडी घेतल्याने निकालाचा कल स्पष्ट झाला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अजितदादा पवार पॅनलने २१ जागांपैकी १० जागांवर विजय खेचून आणला. तर रात्री उशिरापर्यंत ११ जागांवर आघाडी घेतली आहे. तीन सर्वसाधारण गटातील ९ उमेदवार विजयी झाले. तर ब प्रवर्गातील संग्राम सोरटे यांनी विजय संपादन केला आहे.
माळेगाव येथे सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवार (दि.१२) रोजी सकाळी नऊपासून सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजितदादा पवार पॅनलसमोर पुरुषोत्तम जगताप आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अजितदादा पॅनलच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली.
सकाळी ‘ब’ वर्ग प्रतिनिधी गटात संग्राम सोरटे यांनी १३७ पैकी ९३ मते मिळवत विजयाची सुरुवात केली. सर्वसाधारण गटांतील निकालांमध्येही अजितदादा पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचे प्रमोद काकडे, अभिजित काकडे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार डॉ. वसंतराव दगडे यांनी विजय संपादन केला.
मुरूम-वाल्हा गटातही राजवर्धन शिंदे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम भोसले यांनी विजयी गुलाल उधळला. याच गटात बंडखोर नेते, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा दारूण पराभव झाला. होळ-मोरगाव गटात मकरंद सस्ते, मनीषा होळकर, रवींद्र भापकर यांनी विजय संपादन केला. दरम्यान, मतमोजणी केंद्रावर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांचे छायाचित्र हातात घेत घोषणाबाजी केली. विजयी उमेदवारांना पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.
पुरूषोत्तम जगतापांचे आव्हान निकालात
अजितदादा पवार पॅनलने प्रचारात पक्षाचे नेतृत्व, स्थानिक संघटन आणि अनुभवी सहकार क्षेत्रातील उमेदवार यांचा आधार घेतला. दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करीत स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून ताकद आजमावली. युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मतांचे विभाजन, स्थानिक समीकरणे आणि सभासदांचा उमेदवारनिहाय कौल हे निकालातील महत्त्वाचे मुद्दे ठरले. बंडखोर जगताप यांचे बंड सूज्ञ सभासदांनी शमविले. मुरूम-वाल्हा गटात पुरुषोत्तम जगताप यांना सभासदांनी नाकारले. जगताप यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा यांच्या विचारांना साथ दिली.





