Dada Bhuse : साक्षरता मोहीम आणि अपघातग्रस्तांना मदत ; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेची राज्यात २०२२ ते २०२७ या कालावधीत अंमलबजावणी करण्यात येत असून, पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासह सर्व विभागांच्या सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीचा मंत्री भुसे यांनी आढावा घेतला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव तुषार महाजन, योजना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.विविध कारणांमुळे काही व्यक्ती शिक्षणापासून दूर राहिले आहेत. त्यांना किमान लिहिता वाचता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून, राज्यात केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह सेवाभावी व्यक्तींनी योगदान द्यावे, असे आवाहन भुसे यांनी केले.अपघात झालेल्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक लाभ मिळा,वा या उद्देशाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. यायोजनेअंतर्गत प्रकरणे प्रलंबित असल्यास ती तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देशही भुसे यांनी दिले.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना, तसेच मराठी भाषा फाऊंडेशन योजनेचाही भुसे यांनी आढावा घेतला. कृष्णकुमार पाटील यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.




