DA Hike News: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. आज, 28 मार्च रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2% वाढीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता महागाई भत्ता 53% वरून 55% झाला आहे. याचा फायदा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार असून, त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होईल. याआधी जुलै 2024 मध्ये DA 50% वरून 53% झाला होता. महागाई भत्ता म्हणजे काय? महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराशी जोडलेलं एक लाभाचं साधन. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकार वर्षातून दोनदा यात बदल करते. हा भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळतो, पण खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळत नाही. सार्वजनिक क्षेत्रात (PSUs) काम करणाऱ्यांनाही याचा लाभ होतो. किती फायदा होणार? जर एखाद्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर 2% वाढीमुळे दरमहा 360 रुपये जास्त मिळतील, म्हणजे वर्षाला 4,320 रुपये जास्त. तसंच, जर पेन्शन 9,000 रुपये असेल, तर महिन्याला 180 रुपये वाढतील, म्हणजे वर्षाला 2,160 रुपये जास्त मिळतील. ही वाढ कर्मचाऱ्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत करेल. महागाई भत्ता 53% वरून 55% झाला आहे. त्यामुळे मूळ पगार 18000 रुपये आणि महागाई भत्ता 55 टक्केने 9900 रुपये एकूण रक्कम 27,900 रुपये मिळेल.